November 30, 2019
चालु घडामोडी – 30/11/2019

लोकपालच्या बोधचिन्हाचा आणि ब्रीदवाक्याचा स्वीकार
– 26 नोव्हेंबर 2019 रोजी लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्या हस्ते नवी दिल्लीत लोकपालच्या बोधचिन्हाचे (लोगो) प्रकाशन झाले. या शिवाय लोकपालचे ब्रीदवाक्य (घोषवाक्य / motto) म्हणून “मा गृधः कस्यस्विद्धनम्” स्वीकारण्यात आले.
– लोकपालच्या बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्यासाठी एक मुक्त स्पर्धा घेण्यात आली होती. या निवड प्रक्रियेततून उत्तरप्रदेशच्या प्रयागराजचा रहिवासी प्रशांत मिश्रा यांच्या चिन्हाची निवड करण्यात आली.
बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्य विषयी
– चित्रात दर्शवल्याप्रमाणे चिन्हाच्या मध्यभागी न्यायासन आहे, तर आजूबाजूला मानवी चित्रातून जनता दर्शवली आहे. अशोक चक्रासारख्या आकृतीतून डोळा अर्थात लक्ष दर्शवण्यात आले आहे.
– केशरी रंगात कायद्याचे पुस्तक आहे आणि दोन हिरव्या हातांनी समतोल दर्शवला आहे. तिरंगी रंगातला हा लोगो राष्ट्रीय लोकपाल दर्शवतो.
– लोकपालपीठाने सर्वसंमतीने ‘ईशावास्योपनिषध’ याच्या पहिल्या श्लोकात असलेल्या “मा गृधः कस्यस्विद्धनम्” या वाक्याची निवड केली. ‘मा गृधः= लोभ करु नका’; ‘कस्यस्वित्=कोणाच्याही’, ‘धनम्=धनाचा’ म्हणजेच “कोणाच्याही संपत्तीचा लोभ करु नका” असा या वाक्याचा अर्थ होतो.
लोकपाल म्हणजे काय?
– लोकपाल (Ombudsman) म्हणजे अशी अधिकृत व्यक्ती/मंडळ, जे वैयक्तिक तक्रारीची दखल घेत कुठल्याही कंपनी आणि संस्थेची (विशेषत: सार्वजनिक) चौकशी करू शकते.
– सन 2014 मध्ये ‘लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम-2013’ या कायद्याला संसदेनी मंजुरी दिली.
– लोकपाल संस्था कोणत्याही संविधानाच्या आधाराशिवाय चालणारी एक वैधानिक संस्था आहे, जी पंतप्रधान सहित सर्व लोकांच्या भ्रष्टाचाराबाबत तपास करू शकण्यास सक्षम असणार.
– लोकपाल कायद्यानुसार लोकपाल संस्थेवर अध्यक्षांखेरीज किमान आठ सदस्यही नेमण्यात आली आहेत. यापैकी चार सदस्य न्यायिक व चार सदस्य गैरन्यायिक आहेत.
– दोन्ही प्रकाराच्या सदस्यांपैकी किमान 50% सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्गीय, अल्पसंख्यांक व महिला यांच्यातून नेमण्यात आली आहेत.
भारत-चिली DTAA कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
26 नोव्हेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि चिली या देशाच्या दरम्यान दुहेरी कर आकारणी रद्द करण्यासाठी आणि कर चुकवेगिरी रोखण्यासाठी तसेच उत्पन्नावरील करासंदर्भात निराकरण करण्यासाठी दुहेरी करप्रणाली प्रतिबंध करार आणि शिष्टाचारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे.
हा करार आणि प्रोटोकॉल जी-20 OECD BEPS प्रकल्पातली किमान मानके आणि इतर शिफारसी लागू करेल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर करार आणि शिष्टाचार लागू करण्यासाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्या जाणार आहेत. मंत्रालयाकडून याची अंमलबजावणी केली जाणार तसेच अहवाल सादर केला जाणार.
DTAA विषयी
दोन देशांमध्ये कराच्या संबंधित माहितीचे देवाणघेवाण करण्यासाठी दुहेरी करप्रणाली प्रतिबंध करार (DTAA) केला जातो. भारताचा 88 देशांसोबत DTAA झालेला आहे, त्यापैकी 85 कार्यान्वित आहेत. या करारामधून कराचे दर आणि कायदे ठरवले गेले आहेत, जे दुसर्या देशात उत्पन्न घेणार्या नागरिकाला दुहेरी कर देण्यापासून वाचवते. त्यासाठी ‘भारतीय आयकर अधिनियम-1961’ अंतर्गत कलम 90 व कलम 91 अश्या दोन तरतुदी आहेत.
चिली देश
चिलीचे प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका उपखंडाच्या पश्चिम किनारपट्टीवरती असलेला एक देश आहे. चिलीच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला अर्जेन्टीना हे प्रदेश आहेत. सॅंटीयागो हे राजधानी शहर आहे आणि चिलीयन पेसो हे राष्ट्रीय चलन आहे. स्पॅनिश ही इथली अधिकृत भाषा आहे.
हा जगातला सर्वात मोठा तांबा धातूची निर्यात करणारा देश आहे. चिलीत नायट्रेट, सोने, चांदी, लिथियम व लोहाचे सुद्धा प्रचंड साठे आहेत.