एकूण आरोग्य कामगिरीत देशात केरळने पहिला क्रमांक पटकावला असून बिहार व उत्तर प्रदेश सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत. निती आयोगाने आरोग्य निर्देशांक क्रमवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे.
आरोग्य निर्देशांकाची दुसरी फेरी ही २०१५-१६ पायाभूत वर्ष व २०१७-१८ संदर्भ वर्ष मानून तयार केली आहे. अहवालात म्हटले आहे की, आंध्र प्रदेश व महाराष्ट्र हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. ‘दी हेल्दी स्टेट्स, प्रोग्रेसिव्ह इंडिया’ नावाचा अहवाल निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी जाहीर केला.
आरोग्य निर्देशांकात २३ आरोग्य निकषांचा विचार करून क्रमवारी तयार केली आहे, त्यात वेगवेगळ्या घटकांवरचा भर ठरलेला आहे.
हरयाणा, राजस्थान, झारखंड या तीन मोठय़ा राज्यांची क्रमवारी खालावली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये पहिल्या फेरीचे आरोग्य निर्देशांक जाहीर करण्यात आले होते. ते वार्षिक व वर्धित कामगिरीच्या आधारे २०१४-१५ हे पायाभूत वर्ष व २०१५-१६ संदर्भ वर्ष मानून तयार केले होते. आरोग्य मंत्रालय व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जागतिक बँकेच्या तांत्रिक सहकार्याने ही क्रमवारी तयार केली आहे.